शाळेचे स्थान महात्म्म

"देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो.
इतके सुंदर जग तुझे तर किती तू सुंदर असशील!”


सुंदर, मोहक, स्वच्छंदी अशा सौंदर्याने नटलेला निसर्ग कुणाच्याही मनाला मोहून टाकेल. मानवी जीवनाचे सर्वस्व म्हणजे निसर्ग! निसर्ग आणि माणूस एका नाण्याच्या दोन बाजुच! तेव्हा-निसर्गापासून माणूस दूर कसा राहू शकेल? निसर्गाची विविध रुपं मनाला भावतात. निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेताना, जीवनातील सौंदर्याला प्रेरणा देणाऱ्या दिव्य शक्तींशी मन अपोआप संवाद साधायला शिकते. बालवयातच असे संस्कार झाले तर, मनुष्य नक्कीच आयुष्याचा निर्मळ आनंद घेईल. हा आनंद विद्यार्थी दशेत प्राप्त व्हावा, हा या मागील उद्देश.

निसर्गाची साथ, समृद्ध ऐतिहासिक वारसा, पर्यटन क्षेत्र इ. सर्व बाबींचा गोफ जणू शाळेभोवती विणला आहे. काय-काय आहे शाळेच्या सभोवती? असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. तेव्हा जाणून घेऊया!

धावपळीचं जीवन जगणाऱ्या औरंगाबाद शहरापासून १६ कि.मी अंतरावर शांत, रम्य वातावरणात डोंगराच्या कुशीत शाळा वसलेली आहे. सातमाळा अजिंठा रांगेतील येथील परिसर म्हणजेच चौक्याचे डोंगर या डोंगररांगांपैकी जटवाडा परिसरतील दुर्गडी टेकडीच्या अगदी पायथ्याशीच लीनपणे जणू काही डोंगररांगांना वंदन करत उभे आहे, आर्य चाणक्य विद्याधाम!

जटवाडा गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर शाळा आहे. जटवाडा गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे. यादवकालीन -१००८ संकटहर भगवान श्री. पार्श्वनाथजी यांचे सुबक मंदिर इथे असणाऱ्या प्रतिमा ६०० वर्षे प्राचीन आहेत.

याचबरोबर या जटवाडा गावालगतच धोपटेश्वर गाव असून तेथे प्राचीन महादेव मंदिर आहे. शिवकालीन ‘जटाकेश्वर’ महादेव मंदिर आजही जणू काही शिवमहिमा सांगत उभे आहे.

या प्राचीन मंदिरांना भेट देत असतांनाच आपण शाळेत येऊनही पोहचतो. हाच रस्ता आणखी पुढे आपल्याला घेऊन जातो, ऐतिहासिक ठिकाण असलेल्या खुलताबाद या गावात! याच खुलताबादचे जुने नाव ‘रत्नपूर’! अर्थात रत्नापुराचेच आता खुलताबाद झाले आहे. भारतातील हिंदूचे प्रसिद्ध दैवत ‘ श्री भद्रा मारोती मंदिर’ येथे आहे. या मंदिराचे वैशिष्टय म्हणजे येथील मूर्ती निद्रिस्त अवस्थेत असून, भारतात अशी तीनच मंदिरे आहेत. त्यापैकीच एक हे भद्रा मारोती मंदिर जागृत देवस्थान आहे.

खुलताबादचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, मुस्लीम सुफीसंत जर्जरी बक्ष यांचा दर्गा आहे. खुलताबादचा उरूस येथे होतो. मुघल बादशहा औरंगजेबाची कबर खुलताबादला आहे. असे हे ऐतिहासिक ठिकाण शाळेपासून फक्त १७ कि.मी अंतरावर आहे.

खुलताबाद – दौलताबाद ही जवळ जवळ असणारी ठिकाणे. दौलताबादमध्ये यादव कालीन प्रसिद्ध असा दौलताबादचा भुईकोट किल्ला आहे. याच किल्ल्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात आणि शाळेपासून फक्त २१ कि.मी अंतरावर हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. खुलताबाद रस्त्यावर ‘शुलीभंजन’ नावाचे एक ठिकाण आहे. याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी साधना केली होती व येथेच श्री. दत्तात्रयांनी नाथ महाराजांना दर्शन दिले होते.

वेरूळ हे शाळेपासून कि.मी. अंतरावर आहे. जगप्रसिद्ध वेरुळच्या लेण्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपतांना दिसून येतात. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक श्री. घृष्णेश्वर मंदिर वेरुळमध्ये आहे. घृष्णेश्वर मंदिर हे बारावे ज्योतिर्लिंग आहे.

छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे नाव ऐकताच, अंगावर रोमांच उभे राहतात. या शूर पराक्रमी भोसले घराण्याच्या इतिहासाची साक्ष देणारी मालोजीराचे यांची गढी येथे आहे. गढी मोडकळलेल्या अवस्थेत आज असली,तरी भोसले घरण्याचा पराक्रम दर्शवणारी आहे. जगप्रसिद्ध कैलास लेणे, ज्योतिर्लिंग, भोसले घराण्याचे मूळ गाव या सर्व बाबींमध्ये प्रचंड अशा इतिहासाचे दर्शन घडवून देण्याची ताकद आजही आहे.

औरंगाबाद जिल्हातील सर्वोच्च थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ! शाळेपासून अवघ्या कि.मी अंतरावर आहे.म्हैसमाळ म्हणजे छानसे पर्यटन केंद्रच होय.

आपल्या शाळेचे भाग्यच म्हणावे लागेल, की, इतक्या सुंदर ठिकाणी शाळा वसलेली आहे. भोवतालचा प्रत्येक घटक, प्रत्येक ठिकाणी समृद्ध इतिहास व समृद्ध संस्कृती जपणारे आहे. तसेच औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा, पाणचक्की, बौद्ध लेणी अशी प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सारे जवळून पाहण्याची संधी मिळते, हे विशेषच! असे हे ५२ दरवाज्यांचे प्रसिद्ध शहर अभिमानाने आपला इतिहास विद्यार्थ्यांना सांगून, विद्यार्थ्यांना बोलके करत असते. तेव्हा अभिमानाने सांगावे वाटते, आपली शाळा या पवित्र भूमीत, पावित्र्याचा इतिहास जपत आहे.