खेळ

खेळ

" खेळ हा शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे." संघभावना, संघर्ष, खिलाडूवृत्ती, सहकार्य, यशापयश स्वीकारण्याचा दृष्टीकोण, इत्यादी मूल्यांचा विकास खेळांच्या माध्यमातूनच चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

प्रशस्त मैदाने :-

शाळेच्या परिसरातच मैदानी खेळांसाठी 12 प्रशस्त मैदाने तयार केली आहेत. यामध्ये कबड्डी, खोखो, हॉलीबॉल, फुटबॉल यांची प्रत्येकी दोन मैदाने आहेत, तर हँडबॉल, तिरंदाजी ॲथलेटिक्स आणि कुस्ती या खेळांसाठी प्रत्येकी एका मैदानाची सोय आहे.

इन डोअर खेळ :-

मैदानी खेळांची शिवाय बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, योगासन इत्यादी इंनडोर खेळांची स्वतंत्र सुविधा मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

क्रीडा प्रशिक्षण :-

शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध क्रीडा प्रकारांचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित पर्यवेक्षक क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत असतात. गरजेनुसार रोप मल्लखांब, तिरंदाजी या क्रीडा प्रकारांसाठी मानधन तत्वावर प्रशिक्षक बोलावले जातात. मुलांना खेळांचे नियम, कौशल्य, मैदान आखणी व व्यायाम प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते.

रोजची खेळाची तासिका :-

रोज सायंकाळी 1 तास 30 मिनिटांची खेळाची तासिका असते. या काळात शाळेतील संपूर्ण मुले विविध खेळांच्या मैदानावर असतात. सुरुवातीला वार्मिंग अप झाल्यावर खेळ किंवा अंतर्गत स्पर्धा त्या जातात. त्यानंतर परेड घेतली जाते त्यानंतर सामूहिक गीताने या तासिकेची सांगता होते.

समता (परेड) प्रशिक्षण :-

विद्यार्थ्यांमध्ये एकता, शिस्तबद्धता, जोपासली जावी या हेतूने खेळाच्या तासिकेत काही वेळ दररोज परेड घेतली जाते. परेडच्या विविध अंगांचे मुलांना प्रशिक्षण दिले जाते.

वैयक्तिक क्रीडा प्रकार :-

एखाद्या विद्यार्थ्याला वैयक्तिक क्रीडा प्रकारात रस असल्यास त्याला प्रोत्साहन दिले जाते. बुद्धिबळ,कराटे, तिरंदाजी योगासन, कुस्ती, मल्लखांब या वैयक्तिक खेळांच्या प्रशिक्षणाची सुविधा शाळेत उपलब्ध आहे.

शिस्तबद्ध घोष ( बँड) पथक :-

हे शाळेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या पथकात वंशी (Flute), आनक (Side Drum), पणव (Drum), शंख( Bugle), गोमुख (Eumphonium), नागांक (Sexaphone), तुर्य (Trumpet), इत्यादी वाद्य वादनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे वाद्यवृंदाचा पथसंचलन सराव घेतला जातो. दिल्ली येथे 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शाळेच्या घोष पथकाने पश्चिम क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते.

क्रीडा स्पर्धा सहभाग :-

आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या कौशल्याच्या बळावर यशस्वी होण्याचे प्रत्येक खेळाडूपुढे आव्हान असते. हि आव्हाने पेलण्यासाठी तसेच मुलांमधील स्पर्धात्मकतेला प्रेरणा मिळावी यासाठी शाळेचे संघ विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. प्रमुख्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित फुटबॉल, हॉलीबॉल,ॲथलेटिक्स, योगासन व कुस्ती या खेळां च्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला जातो. याशिवाय विद्याभारतीच्या खेलकूद स्पर्धांमध्ये जसे तिरंदाजी, कबड्डी, फुटबॉल, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, योगासने इत्यादी मध्ये सहभाग घेतला जातो.

क्रीडा महोत्सव :-

दर एक वर्षाआड डिसेंबर महिन्यात सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांचे शालेय स्तरावरच भव्य आयोजन केले जाते. या साप्ताहिक क्रीडा महोत्सवात वयोगट व वजन गटानुसार क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात प्रत्येक दिवशी शुभारंभ व पदक वितरण सोहळ्यासाठी क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंना आमंत्रित केले जाते. सुसज्ज क्रीडा कक्ष: शाळेच्या क्रीडा विभागासाठी स्वतंत्र क्रीडा प्रमुखांची नियुक्तीकेली असून प्रमुखांच्या देखरेखीखाली सर्व क्रीडाविषयक नियोजनाची आखणी व अंमलबजावणी केली जाते. विविध क्रीडा प्रकारांना लागणाऱ्या निरनिराळ्या साधनांनी शाळेचा क्रीडा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे.

सूर्यनमस्कार- योगासन :-

या क्रीडा प्रकारात शाळेच्या मुलांचे विशेष नैपुण्य असून विभाग व राज्यस्तरावर मुलांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. रथसप्तमी निमित्त “सूर्य कुंभ” ही सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केली जाते. दिनांक 21 जून रोजी योग दिनाच्या निमित्ताने योगासन स्पर्धेचे आयोजन केले जाते.