उपक्रम

व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम

वसतिगृहातील चाकोरीबद्ध दिनचर्येचा कंटाळा येऊ नये म्हणून पुढील प्रमाणे विविध आनंददायी उपक्रमांचे नियोजन / आयोजन केले जाते.

दैनंदिन व्यायाम :-

मुलांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योगासने, व व्यायाम प्रकार घेतले जातात.

उंट स्वारी व घोडेस्वारी :-

प्रत्येक सत्रात सुमारे दोन वेळा उपलब्धते नुसार मुलांना उंट व घोडेस्वारीचा आनंद घेता येतो. यात घोडेस्वारीचे कौशल्य शिकवणे हा उद्देश नसतो.

विविध कलागुणदर्शन :-

मुलांच्या अंगी असणाऱ्या विविध सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक सत्रात किमान एकदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचे सर्व नियोजन केवळ मुलेच करतात.

विविध स्पर्धांचे आयोजन :-

मुलांमधील निकोप स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी स्पर्धात्मक उपक्रम उपयुक्त ठरतात. या दृष्टीने वसतीगृह प्रशासनाद्वारे अनेक स्पर्धा घेतल्या जातात. उदा समूहगीत स्पर्धा, मनोरे, रस्सीखेच, क्रॉसकंट्री, निसर्गोपचार उपक्रम इ.

वनभोजन :-

निसर्गाच्या सहवासात राहून, मुक्तपणे खेळून-बागडून, वनभोजनाचा आस्वाद घेणे या उद्देशाने वर्षातून दोन वेळेस या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

विविध सण व उत्सव :-

भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना आपली संस्कृतीतील विविध सणांचे महत्व व मूल्य समजावून सांगण्याच्या हेतूने अनेक सण व उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. उदा. गोकुळ अष्टमी, पोळा, विजया दशमी, होळी व धुलीवंदन, इ.

गटश: संवाद :-

निवासी मुले व त्यांचे पालकत्व असणारे त्यांचे पर्यवेक्षक दादा यांच्यातील नाते अधिक आपुलकीचे व्हावे, तसेच मुलांच्या अडी-अडचणी समजून घ्याव्यात, त्यांना आधाराचा हात मिळावा या हेतूने नियमितपणे पर्यवेक्षक दादा व त्यांच्या गटातील मुलांचा साप्ताहिक गटश: संवाद होत असतो.

स्वयंशासन दिन :-

मुलांमध्ये शिस्त व स्वावलंबनाचे मूल्य रुजावे यासाठी वरील उपक्रम घेतला जातो. या वेळी मुलेच संपूर्ण दिवसभर वसतिगृहाच्या सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळतात.

विविध जबाबदाऱ्या :-

मुलांना विविध कामे जबाबदारीने करण्याची सवय लागावी यासाठी विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाते. यात प्रामुख्याने स्वच्छता प्रमुख, वीज प्रमुख, भोजन प्रमुख इ.