मूळ संकल्पना

आर्य चाणक्य विद्याधाम : एक अग्रगण्य शैक्षणिक प्रयोग भूमी...!

भारतीय समाज नेहमीच ज्ञानाचा उपासक राहिला आहे. याच देशात गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची आदर्श परंपरा विकसित झाली. शिक्षणाने समाज सुसंस्कारित होतो व असाच समाज एका बलशाली राष्ट्राचा आकार घेतो. अशी नवीन पिढी घडविण्याचे सामर्थ्य शाळा व शिक्षकांत असणे अत्यंत आवश्यक आहे.

आजची शैक्षणिक दुरवस्था पाहता या देशाला पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एक आदर्श शैक्षणिक संकुल उभारावे असा विचार पुढे आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. मा. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने संघ विचाराने प्रेरित झालेल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सन 1997 मध्ये राजर्षी शाहू शिक्षण व ग्रामोद्योग या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या संस्थेच्या अंतर्गत , समाजात चेतना निर्माण करणाऱ्या व चंद्रगुप्ता सारखा सम्राट घडवणाऱ्या थोर आचार्यांच्या नावे आर्य चाणक्य विद्याधाम या निवासी विद्यालयाची स्थापना संभाजीनगर( औरंगाबाद) येथे सन 1998 मध्ये करण्यात आली. शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर दुर्गडी टेकडीच्या पायथ्याशी 30 एकरांचा निसर्गरम्य परिसर यासाठी निवडण्यात आला.

या विद्याधामतून बाहेर पडणारा विद्यार्थी शारीरिक, बौद्धिक, भावनिक दृष्ट्या विकसित असेल व असेच विद्यार्थी देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ घडवतील असा विश्वास संस्थेला आहे .म्हणूनच त्या संस्थेचे ब्रीदवाक्य “बलशाली भारताचे स्वप्न पाहणारी संस्था” असे निश्चित झाले.

शाळा आणि घर यांचा सुरेख संगम झाल्याचा अनुभव येथे आल्यानंतर होतो. पुन्हा लहान व्हावे, व येथे राहून शिक्षण घ्यावे असा मोह प्रत्येकालाच होतो. शाळेचे वेळापत्रक एखाद्या संस्कार शिबिर यासारखे आहे घरी पालकांना अशक्य वाटणाऱ्या अनेक बाबी येथील वातावरणात सहज शक्य होतं मग ते पहाटे लवकर उठून व्यायाम, सूर्यनमस्कार करणे असो की , रात्री दुग्धपान करून आईची प्रार्थना म्हणून झोपणे असो.

मुलांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस व चौरस आहाराची योजना केली जाते. त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलावे म्हणून विविध अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रभक्ती, खिलाडूवृत्ती, सहकार्य, भूतदया इत्यादी मूल्ये त्यांच्यामध्ये रुजावी यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले जातात.

आजचे शिक्षण केवळ वर्गाच्या चार भिंतीत बंदिस्त होऊन पाठांतर पुरतेच मर्यादित झालेलेआढळते. या परीक्षाभिमुख शिक्षण पद्धतीत “टक्क्यांना” अवास्तव महत्त्व आले आहे. यामुळेच शिक्षक ,विद्यार्थी ,आणि पालक तिघेही या परीक्षा व परीक्षेतील गुणांच्या अपेक्षांचे ओझे वाहताना दिसतात. आम्ही मात्र परीक्षेतील गुणां पेक्षा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना जास्त महत्त्व देतो. प्रत्येकाच्या अंगी कोणता न कोणता सुप्त गुण असतोच असा आमचा विश्वास आहे. गरज असते ती फक्त त्या गुणांना ओळखण्याची, व त्यांना चालना देण्याची. नेमके हेच काम आर्य चाणक्य विद्याधाम मध्ये अतिशय निष्ठेने केले जाते व त्यासाठी आम्ही परंपरागत शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विचारांचीही जोड दिली आहे.