सहशालेय

सह-अभ्यासक्रम उपक्रम

हसू द्या, खेळू द्या | हसत खेळत शिकू द्या |
गावु द्या, नाचू द्या |गात –गात, नाचत-नाचत शिकू द्या |

या वि.वि. चिपळूणकरांच्या काव्यपंक्तीनुसार आर्य चाणक्य विदयधाममध्ये विद्यार्थ्यां च्या सर्वागीण विकासासाठी सहशालेय विभाग कार्यरत आहे. प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या प्रस्तावनेतच विद्यार्थ्यांना जीवनविषयक कौशल्ये, स्वजाणीवेची ओळख, उपक्रमा व्दारे स्वयंअध्ययन, सृजनशील विचारास प्राधान्य व यातूनच सुजाण नागरिकाची जडण घडण व्हावी असा हेतू ठेवूनच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. म्हणूनच सहशालेय उपक्रमातून वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

उपासना (रोजची प्रार्थना) :-

उपासना म्हणजेच शाळेची प्रार्थना (परिपाठ) होय. रोज २८ मिनिटांची उपासना असते. दिवसाची सुरुवात आनंददायी, मंगलमय वातावरणात सरस्वती स्तवनाने होते. यात ध्वजारोहण, दिनविशेष, संस्कृत आणि इंग्रजी संभाषण, बोधकथा, बातम्या / प्रश्नमंजुषा, विनोद, व मासिक पाठांतराचे गीत इ. बिंदूंचे सादरीकरण होते.प्रत्येक विद्यार्थ्यांला व्यासपीठावर येण्याची संधी मिळते. यातून विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा वाढीस लागतो.

क्षेत्रभेट :-

अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक वर्गाच्या वर्षभरात चार क्षेत्रभेटींचे नियोजन. उदा.- महानगर पालिका, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, साखर कारखाना, व विविध उद्योगांना भेटी.अभ्यासक्रमातील भाग चार भिंती च्या बाहेर जाऊन अभ्यासण्याची संधी व प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते. क्षेत्रभेटीत प्रत्येक विद्यार्थ्याला जबाबदारीचे वाटप उदा. – (गणवेश प्रमुख, हिशोब प्रमुख, छायाचित्र प्रमुख) यातून जबाबदारीची जाणीव निर्माण होते.

शनिवार मेजवानी :-

विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी मनोरंजक, प्रेरणादायी व्हावे यासाठी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी “शनिवार मेजवानी” या उपक्रमाचे आयोजन वर्षभर केल्या जाते. उदा.- बालकवी एकनाथ आव्हाड, व्यंगचित्रकार श्री वैजनाथ दुलंगे, कविवर्य दासू वैद्य, विसूभाऊ बापट, हास्यसम्राट प्रकाश भागवत, एव्हरेस्ट शिखर सर केलेले भूषण हर्षे, भारुडकार निरंजन भाकरे इ.

आनंद दिवस :-

शाळेचा पहिला स्वागताचा दिवस व शेवटचा दिवस आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो.शाळेत येतांना मन शिकण्यासाठी प्रेरित व आनंददायी व्हावे हा यामागे हेतू आहे.या निमित्ताने जादूचे प्रयोग, विविध गमत-जमतीशीर खेळ, हास्य कलाकारांचे सादरीकरण करण्यात येते.

सहलीतून ‘मातृभूमी दर्शन’ :-

“भारत एक जमीन का टूकडा नही जिता जागता राष्ट्रपुरुष है” या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या काव्यपंक्तीची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना “मातृभूमी दर्शन” सहलीव्दारे घडवून आणल्या जाते.ही सहल एक वर्षाआड संपूर्ण देशभर वर्गशः काढली जाते. यामध्ये भारतातील विविध राज्यात असलेल्या संस्कृती, ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक, पारंपारिक स्थानांचे दर्शन घडविल्या जाते.

चाणक्य दर्पण – मासिक वार्तापत्र :-

विद्याधामात झालेले महिनाभरातील उपक्रम, कार्यक्रम विद्यार्थी शब्दबध्द करून चाणक्य दर्पण मासिक विद्यार्थी काढतात.यासाठी विद्यार्थ्यांचेच एक संपादकीय मंडळ आहे.बातमीची निवड व लिखाण, शुद्धीकरण, छायाचित्र इ. कामे विद्यार्थीच करतात.

शिक्षक-विद्यार्थी मुक्त संवाद :-

महिन्याच्या पहिल्या शनिवारी १०-१५ विद्यार्थ्यांचा एक गट व एक शिक्षक यांच्या मध्ये अनौपचारिक संवाद होतो. यातून विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत हे लक्षात येते. याच बरोबर मी काय सकारात्मक काम केले हे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

कार्यानुभव तासिका :-

आठवड्यात एक तासिका पर्यावरण कार्यानुभवाची घेतली जाते.यातून पर्यावरण विषयाची आवड निर्माण होते व कार्यानुभवातून नवनिर्मिती केल्या जाते. उदा- झाडांचे संगोपन, झाडांना पाणी घालणे, फळांची बाग तयार करणे इ.

बोलके फलक :-

विद्याधामाच्या परिसरात वावरतांना विद्यार्थ्यांना सातत्याने चांगले पाहायला मिळावे,वाचायला मिळावे म्हणून विद्यार्थी बोलका फलक, आचार्य बोलका फलक लावलेला आहे.यावर विद्यार्थी, आचार्य, ताई हे, नवनवीन कात्रणे लावणे, लिखाण करणे, चित्र लावणे इ. उपक्रम करतात.

वाचन तासिका :-

आठवड्यात प्रत्येक वर्गाची एक तासिका वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचकवीर, मला आवडलेले पुस्तक, पुस्तक समीक्षा, अशा उपक्रमांची जोड दिली जाते.

संगणक प्रशिक्षण :-

आठवड्यात प्रत्येक वर्गाच्या दोन तासिका. संगणकाच्या प्रशिक्षणातून जगाशी जोडण्याचा प्रयत्न. एक्सेल, वर्ड, पॉवर पॅाईट चे विशेष अध्यापन. MS-CIT च्या धर्तीवर विशेष अभ्यासक्रमाची निर्मिती.

संगीत :-

आठवड्यात प्रत्येक वर्गाच्या दोन तासिका. गायन व तबला, पेटी,या वादन विषयांचे प्रशिक्षण संगीत परीक्षेची (गांधर्व मंडळ) व्यवस्था. अधिक गती असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त प्रशिक्षण.

चित्रकला :-

कल्पनाशक्ती व नवनिर्मितीच्या विकासासाठी चित्रकला प्रशिक्षण. प्रत्येक वर्गाच्या आठवड्यात दोन तासिका हस्तकला, मातीकाम, कागदकाम, रंगकाम, इ. विषयांचे प्रशिक्षण राखी निर्मिती, आकाश कंदील निर्मिती,पंतग निर्मिती इ.उपक्रमाचे आयोजन केले जाते.एलिमेंट्री, इंटरमिजिएट परीक्षेला बसविण्याची व्यवस्था विज्ञान प्रदर्शन नाविन्यता, वैज्ञानिक द्दष्टीकोन विकासित करण्यासाठी दरवर्षी विज्ञान प्रदर्शन आयोजन केल्या जाते. प्रदूषण,स्वच्छता, पर्यावरण, अवकाश, आयुर्वेद, मानवी शरीर,कृषी, उद्योग, रसायन इत्यादी विषयावर प्रयोगांचे सादरीकरण केल्या जाते.

दिनविशेष :-

भारतीय संस्कृतीला अनुरूप सण, उत्सव जयंती,पुण्यतिथीचे आयोजन केले जाते. भारतीय संस्कृती ही जगाला मार्गदर्शन करणारी आहे हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा यासाठी सण, उत्सव, विविध महापुरुषाच्या जयंत्या पुण्यतिथ्या,दिनविशेष साजरे केले जातात. सर्व उपक्रमांची रचना, योजना व सादरीकरण हे विद्यार्थीच करतात यामुळे हे उपक्रम सातत्याने नवीन, मनोरंजनात्म्क साजरे होतात.यातून विद्यार्थ्यां चा थेट सहभाग वाढतो व सर्वागीण विकासाला चालना मिळते.

पालक प्रबोधन :-

पालकांचे ‘माझ मूल व त्याचा विकास’ या विषयावर प्रबोधन केले जाते.यामुळे आपल्या पाल्याच्या विकासाकडे कसे पहावे हा दृष्टीकोन पालकांचा विकसित होतो.

वार्षिकोत्सव :-

विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या कला, कौशल्याचे सादरीकरण करणारे व्यासपीठ म्हणजे आनंददायी वार्षिकोत्सव. मध्यवर्ती संकल्पना व मुक्त अशा स्वरुपात सप्तरंग वार्षिकोत्सवाचे सादरीकरण होते. नृत्य, नाटय, अभिनय, घोष, योगासन, गायन, वादन इ. कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते.

दैनंदिनी :-

शालेय वार्षिक नियोजन असलेली दैनंदिनी वर्षाच्या सुरुवातीलाच दिली जाते.यामध्ये रोजचं लिखाण विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते. याच बरोबर स्वमूल्यामापन व पाक्षिक संकल्पाचे मूल्यमापन विद्यार्थ्यी स्वतः करतात.

व्यवसाय मार्गदर्शन :-

वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मला पुढे कोणते करिअर निवडायल हवे? या विषयावर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन केल्या जाते. उदा.- उद्योगातील, कृषीतील, वैद्यकिय शास्त्रातील, शिक्षणातील, संरक्षणातील संधी यावर चर्चा केली जाते. दहावी झाल्यावर मी कोणत्या क्षेत्रात माझे करिअर करायचे या विषयी मुलांना निश्चित दिशा मिळते.

लैंगिक शिक्षण कार्यशाळा :-

शरीरात होणाऱ्या बदलांची योग्य पद्धतीने माहिती होण्यासाठी लैंगिक शिक्षण कार्यशाळा वर्षभर वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात.यामध्ये सुंदर मी होणार, कळी उमलताना, इ. विषय होतात.

स्वामी विवेकानंद म्हणतात “आयुष्यभर आत्मसात झालेला व मेंदूत अस्ताव्यस्त कोंबलेला ज्ञानाचा भारा म्हणजे शिक्षण नव्हे. आपल्याला जीवन घडविणारे माणूस निर्माण करणारे व करविणारे शिक्षण हवे” याचसाठी चाललेला हा छोटा प्रयत्न.