शैक्षणिक प्रणाली

शैक्षणिक व्यवस्थापन

‘उत्तम विद्यार्थी घडविणे’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अर्थपूर्ण , वैशिष्ट्यपूर्ण आणि परिणामकारक शिक्षण देणारी शिक्षण संस्था अनेक वैशिष्ट्यांनी खालीलप्रमाणे परिपूर्ण आहे:

पाठ तपासणी / निरीक्षण :-

विद्याधामात अध्यापन कार्य करणारे अध्यापक प्रशिक्षित आहेत. त्यांचे अध्यापन कार्य अधिक परिपूर्ण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्यात शाळेचे प्रधानाचार्य सहप्रधानाचार्य मिळून प्रत्येक आचार्यांच्या महिन्यात एका पाठाचे निरीक्षण करतात. प्रत्येक शिक्षकाचा महिन्यात एक पाठ तपासला जातो.

शिक्षक-मुखाध्यापक संवाद :-

प्रत्येक महिन्यात ज्या अध्यापकांच्या पाठाचे पाठ निरिक्षण झाले आहे. त्यांच्याशी प्रधानाचार्य, सहप्रधानाचार्य संवाद साधतात. पाठातील चांगल्या बाबी, त्रुटी याविषयी चर्चा केली जाते. तसेच अध्यापकांच्या अध्यापक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या त्यांचे एकूण व्यक्तिमत्व, चांगल्या बाबी, त्रुटी त्यांची जबाबदारी, विद्यार्थी प्रतिसाद विद्याधामाच्या अपेक्षा या विषयी संवाद साधल्या जातो.

आदर्श पाठ सादरीकरण :-

शिक्षकांचे अध्यापन अधिकाधिक उत्तम व्हावे, आदर्शाकडे वाटचाल व्हावी व इतरांच्या मध्ये असणाऱ्या उत्कृष्ट अध्यापन कौशल्याविषयी चर्चा व्हावी या हेतूने विद्याधामातील आचार्य महिन्यात एक आदर्श पाठ (नमुना पाठ) सादर करतात. या पाठासाठी संबंधित वर्ग व सर्व अध्यापक उपस्थित असतात. पाठ सादरीकरणानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा केली जाते, याच बरोबर शिक्षण क्षेत्रातील व इतर शाळातील नामवंत अध्यापकांच्या आदर्श पाठच्या सादरीकरणाचे नियोजन केले जाते. ज्यामुळे विद्याधामातील अध्यापकांना आदर्शाची प्रेरणा मिळते.

अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन :-

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच पुढील शैक्षणिक वर्षातील अभ्यास क्रमाचे इयत्ता नुसार व विषयानुसार नियोजन केले जाते. वार्षिक नियोजन करताना कोणत्या महिन्यात किती व कोणता अभ्यासक्रम पूर्ण होणार याचे विचारपूर्वक नियोजन करून त्यानुसार पुर्ततेचा पाठपुरावा केला जातो.

विद्यार्थी समुपदेशन :-

वर्तणुकीशी संबंधित समस्या असणारे विद्यार्थी, अभ्यासात गतीमंदता असणारे विद्यार्थी शोधून त्यांना योग्य समुपदेशन केले जाते. गरज भासल्यास, त्यांच्या पालकांशी संवाद साधून तज्ज्ञ समुपदेशकांकडून मार्गदर्शन घ्यावे असा सल्ला दिला जातो.

पालकांना प्रोत्साहन / उपदेश :-

शैक्षणिक वर्षातील प्रथम पालक सभेचा विषय ‘पालक प्रबोधन’ असा असतो. शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञामार्फत पालक-पाल्य नाते, आपल्या पाल्याशी सकारात्मक प्रेरणादायी संवाद, सजग पालकत्व अशा विविध अंगांनी पालकांचे प्रबोधन केले जाते.

पालक सभा :-

प्रत्येक शैक्षणिक वर्षात ४ पालक सभा नियोजित केलेल्या असतात. निवासी शाळा असल्यामुळे पालक सभेचा उद्देश दुहेरी असतो. किमान दीड महिन्याच्या अंतराने पालकांची आपल्या पाल्याशी भेट व्हावी तसेच पालकांना आपला पाल्य कसा राहतो? हे समजावे व शाळेत त्याच्या शिक्षकांशी संवाद साधता यावा, त्याची प्रगती, अभ्यासतील अडचणी जाणून शिक्षक पालक संवाद व्हावा हा दुसरा उद्देश.

शिक्षक प्रशिक्षण :-

विद्याधामातील अध्यापक प्रशिक्षित आहेतच, परंतु त्यांच्या अध्यापन कौशल्यात अधिक भर पडावी व अध्यापकांना नवीन तंत्र-कौशल्य यांचा उपयोग होऊन अध्यापन अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व कौशल्यपूर्ण व्हावे यासाठी विविध शिक्षणविषयक प्रशिक्षणांची रचना केलेली असते. त्यासाठी शिक्षकांना पाठविले जाते. काही प्रशिक्षणे विद्याधामात तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून नियोजित केली जातात, तर शिक्षण विभागाकडून तसेच इतर मान्यता प्राप्त शिक्षण संस्थाकडून आयोजित प्रशिक्षण घेण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध करून दिल्या जाते.

शिक्षकांचे मूल्यांकन :-

अध्यापकांचे अध्यापन कार्य आणि मूल्यमापन कार्य (पेपर / वह्या) या संदर्भात निरीक्षणे व नोंदी ठेवून मूल्यमापन केले जाते. वेळोवेळी त्यांच्याशी त्याविषयी संवाद साधल्या जातो. शैक्षणिक वर्षाच्या आरंभी त्यांना काही उद्दिष्टे (task) दिली जातात व वर्षभरातील त्या संदर्भात त्यांनी केलेल्या कार्यवाहीच्या आधारे वर्षाखेरीस त्यांचे मूल्यमापन केले जाते.

दैनंदिन गृहपाठ व व्यवसाय मार्गदर्शन तासिका :-

दररोज अभ्यास क्रमाच्या सहा शालेय तासिका संपल्यानंतर २ अतिरिक्त तासिकांचे नियोजन केलेले असते. त्यापैकी पहिली तासिका गृहपाठासाठी असते. आठवड्यात प्रत्येक विषयाचा अभ्यास पक्का व्हावा गृहपाठ पूर्ण करता यावा यासाठी प्रत्येक विषयाला एक याप्रमाणे तासिका नियोजन असते. अतिरिक्त तासिकेतील दुसऱ्या तासिकेत स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केले जाते व उर्वरित विद्यार्थ्यासाठी अभ्यास तासिका नियोजित असते.

स्पर्धा परीक्षा :-

विद्याधामात दरवर्षी इयत्ता पाचवीच्या पात्र विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती परीक्षेस बसवले जाते. इयत्ता ६ वी साठी गणित ऑलंपियाड , इयत्ता ७ वी साठी इंग्रजी ऑलपियाड व इयत्ता ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्याना बसवून त्यांचे मार्गदर्शन शाळेत नियमित केले जाते. या शिवाय इतर स्पर्धा परीक्षांना इच्छुक विद्यार्थी बसू शकतात पण त्यासाठी मार्गदर्शन तासिका घेतल्या जात नाहीत.

विज्ञान प्रयोगशाळा :-

विद्याधामात विज्ञान विषयासाठी सुसज्ज अशी विज्ञान प्रयोग शाळा आहे. विज्ञान विषयासाठी प्रत्येक वर्गाला आठवड्यात एक प्रयोगाची तासिका असते. एका महिन्यात दोन प्रयोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दाखवावेत तर दोन प्रयोग विद्यार्थ्यानी स्वत: करावेत अशी रचना आहे. दोन्ही सत्रात विज्ञान प्रयोगच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे नियोजन असते. प्रत्येक मुलाने प्रयोग शाळेत जावे स्वत:च्या हाताने साहित्य हाताळून प्रयोग करावा त्याची जिज्ञासा वृत्ती वाढून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा हा यामागील उददेश आहे.

गणित प्रयोगशाळा :-

मराठवाड्यातील पहिली गणित प्रयोग शाळा हे विद्याधामाचे वैशिष्ट्य. क्षेत्रफळ काढणे, मापन करणे, मुलभूत संकल्पनांचे तसेच सूत्रांचे उपयोजन करणे, अशी गणित विषयाच्या प्रात्यक्षिकांची रचना केलेली आहे. प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी गणित विषय गणित प्रयोग शाळेत जाऊन शिकतात. दोन्ही सत्रात गणित विषयाच्या सुद्धा प्रयोग परीक्षा नियोजित असतात.

संगणक प्रयोगशाळा :-

आधुनिक युगाची, स्पर्धेच्या, तंत्रज्ञानाच्या युगाची गरज संगणक शिक्षण होय. विद्याधामात सुसज्ज असा संगणक कक्ष आहे. आठवड्यात दोन तासिका संगणकासाठी दिलेल्या असतात. संगणक कक्षात दोन विद्यार्थ्यांसाठी एक संगणक अशी व्यवस्था आहे. इयत्ता १० वी पर्यंत विद्यार्थांना MS-CIT परीक्षा देता येईल एवढे प्रशिक्षण त्यांना मिळते. दर रविवारी MS-CIT च्या अतिरिक्त तासिकांचे नियोजन केलेले असते.

स्मार्ट क्लास (डिजिटल वर्ग) :-

विद्याधामातील प्रत्येक वर्ग हा स्मार्ट क्लास आहे. प्रत्येक वर्गात दृक-श्राव्य माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी ‘के-यान’ या दृक-श्राव्य उपकरणाची व्यवस्था आहे, ज्या द्वारे विद्यार्थी दृक-श्राव्य माध्यमातून अध्ययन करतात. प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर ‘के-यान’ उपकरणात उपलब्ध आहे.